सुभाष मुळे
गेवराई : अतिवृष्टी व महापुरामुळे गेवराईसह बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे घर, संसारोपयोगी वस्तू, शेती, पशुधन आणि इतर व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांवर आभाळाएवढं दुःख कोसळलं आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून कष्टकरी शेतकऱ्यांनी माना टाकल्या आहेत. “आपत्तीच्या काळात माझा शेतकरी एकटा नाही. महायुती सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व शिलेदार मदतकार्य पोहोचवण्यासाठी सज्ज आहेत. शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये. शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे”, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. असं असलं तरी मदत होईल, परंतु ती तुटपुंजी असेल. घामाचा व हक्काचा मोबदल्यापासून शेतकरी कोसोदूर गेला आहे.
दरम्यान, प्रशासनाने पुरग्रस्त गावांची पाहणी सुरू केली असून, नुकसानग्रस्तांची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरं उद्ध्वस्त झालेल्या तसेच शेतपिकांचं संपूर्ण नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत, पुनर्वसन आणि आवश्यक ते सर्व सहाय्य पुरवले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महापुरामुळे अनेक कुटुंबांचा संसार विस्कळीत झाला आहे. जनावरे वाहून गेली, धान्य आणि बियाण्याचा साठा नष्ट झाला, तर लहान-मोठ्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी स्थानिक स्वंयसेवी संस्था, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मदत कार्यात झोकून देत आहेत. “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच खरी सेवा आहे. शासन मदतीसाठी सदैव तत्पर आहे. नुकसान झालेल्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आम्ही आता अजितदादांनी तत्परतेने पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.