सुभाष मुळे
गेवराई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बुधवारी (दि.१७) गेवराई विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. तालुक्यातील खामगाव, नागझरी, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव आणि गंगावाडी शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीर दिला.
यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी पुरग्रस्त भागातील नुकसानीचा तपशील अजितदादा पवार यांना सविस्तर सांगितला. अतिवृष्टी आणि जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे गेल्या काही दिवसांत गोदाकाठच्या गावांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतजमिनी, घरे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सव्वा लाख क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले गेले की, परिसरातील अनेक गावांवर संकट ओढवते. जोडरस्त्यांवरील पुलांची उंची वाढविणे आणि पुररेषेत येणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करणे ही मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या प्रलंबित प्रश्नांवर आता ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी यावेळी दिले.
दरम्यान "पुरस्थितीतील समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. ग्रामस्थांचे पुनर्वसन, रस्त्यांची उंची वाढविणे आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य ती दखल घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे," असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी देऊन उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली. या संदर्भात महायुती सरकार लवकरच निर्णय घेईल, असे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार, माजी आमदार, सभापती, माजी सभापती व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.