Majalgaon Reservoir Fish Seed Issues Pudhari
बीड

Majalgaon Dam | मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांची माजलगाव जलाशयाची पाहणी; मत्स्यबीजाबाबत मच्छीमार संघटनेचे प्रश्नचिन्ह

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Majalgaon Reservoir Fish Seed Issues

माजलगाव : माजलगाव जलाशयात ठेकेदारामार्फत मत्स्यबीज सोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मत्स्यबीज आढळून न आल्याचा आरोप मच्छीमार संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी तसेच बीड येथील मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी भास्कर सानप आणि अजय सोनवणे यांनी माजलगाव जलाशयाची प्रत्यक्ष पाहणी (हेरिंग) केली. या पाहणीदरम्यान संबंधित ठेकेदाराने जलाशयात सोडल्याचा दावा केलेले मत्स्यबीज प्रत्यक्षात आढळून आले नसल्याचा दावा मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष अंकुश बलिया यांनी जय हनुमान मत्स्य सहकारी संस्थेवर गंभीर आरोप केले. मत्स्यबीज सोडल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केली जात असेल, तर ती शासनासह स्थानिक मच्छीमारांचीही फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला.

अंकुश बलिया म्हणाले की, माजलगाव जलाशयावर अनेक स्थानिक मच्छीमारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. जलाशयात आवश्यक प्रमाणात मत्स्यबीज न सोडल्यास मासे उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊन मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.

पुढे बोलताना त्यांनी शासनाला इशारा दिला की, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्थानिक मच्छीमारांना न्याय न दिल्यास मच्छीमार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारण्याचाही इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणामुळे माजलगाव परिसरातील मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने वस्तुस्थिती जनतेसमोर आणून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT