Crime News pudhari photo
बीड

Beed Gutkha Seized : बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

प्रतिबंधित गुटख्यासह पानटपरीवर गुन्हे, तर एका हॉटेलाचा परवाना निलंबित

पुढारी वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थांवविरोधात मोठी मोहीम उघडली असून, प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच मानवी आरोग्याला घातक त्रुटी आढळून आल्यामुळे जालना रोडवरील एका चहा-नाश्ता सेंटरचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

२४ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बशीरगंज येथील 'जमील पान सेंटर'वर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पानटपरीवर प्रतिबंधित गोवा आणि बाबाजी पानम मसाल्यासह ५ हजार ६०८ रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पानटपरीचालक सैयद मुशरत अली सैयद हमीद अली आणि विक्रेता शेख तोहिद अफसर यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशाच प्रकारची दुसरी कारवाई त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या कमाणी जवळील एका चहा व भजीच्या ठेल्यावर करण्यात आली. या ठिकाणी तपासणी केली असता खाकी रंगाच्या पुठ्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

या प्रकरणी ठेला चालक शेख माजेद शेख खालेद याच्याविरुद्धही बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या भागात अवैध व प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत, २७ जुलै २०२६ रोजी जालना रोडवरील साठे चौक येथील 'मे. अप्पा चहा नाश्ता सेंटर'ची अन्न सुरक्षा पथकाने तपासणी केली. या तपासणीदरम्यान आस्थापनेमध्ये उंदराची विष्ठा, कीटक प्रतिबंधक व्यवस्थेचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल नसणे, भांडी धुण्याच्या जागेवरच अन्न शिजवणे, नॉन-फूड ग्रेड पिशव्या व वृत्तपत्राचा वापर, अवैध कृत्रिम रंगांचा वापर आणि कामगारांचे तंबाखू सेवन यांसारख्या मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या गंभीर त्रुटी निष्पन्न झाल्या. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत या हॉटेलचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

सदरची ही धडक कारवाई छत्रपती संभाजीनगरचे सहआयुक्त (अन्न) श्री. करकाळे आणि अन्न व औषध प्रशासनाचे बीडचे सहायक आयुक्त नि. दि. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सी. सु. खंदारे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT