बीड : कापूस, सोयाबीन व तूर या पिकांना योग्य भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक दिली. शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी हातात कापसाची व तुरीची झाडे घेऊन आपले लक्ष वेधले.
राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट व चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना, शेतमालाला मात्र योग्य व न्याय्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बीड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्ता भरणे तसेच प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा.
सोयाबीनसाठी ७ हजार रुपये व तुरीसाठी १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करावा.
CCI कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा.
हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमालाच्या दरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात भरून द्यावा.
विविध योजना, सबसिडी, अनुदान व पीक विम्याची थकीत रक्कम तात्काळ जमा करावी.
मे महिन्यापूर्वी सर्व खरीप व रब्बी पिकांचा हमीभाव जाहीर करावा.
महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करावे.
या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला. या मोर्चात शेतकरी राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, डॉ. गणेश ढवळे, कुलदीप करपे, सुहास जायभाय, राजू गायके, बाळासाहेब मोरे पाटील, गणेश नाईकवाडे, अर्जुन सोनवणे, कॉम्रेड अजय बुरांडे, अजय राऊत, दिनेश गुळवे, धनंजय मुळे, राजाभाऊ देशमुख, नयना भाकरे, हिराबाई कांबळे, अंकुश सातपुते, प्रा. ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.