केज: अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना लाडेवडगाव (ता. केज) येथे घडली.
सुर्यकांत व्यंकटी शेप (वय ४२) असे शेतकऱ्याचे नाव असून, तो आपल्या दीड एकर शेतीत शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा या चिंतेने तो मानसिक तणावाखाली गेला.
मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) दुपारी सुमारास त्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळाने आई घरी परतल्यावर मुलाने विष घेतल्याचे दिसताच तिने आरडाओरडा करत मदतीसाठी हाका मारल्या. तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले. मयत शेतकऱ्यामागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार असून, कुटुंबाचा आधारस्तंभ हरवल्याने गावात शोककळा पसरली आहे.