केज : पडीक जमिनीत म्हशी का बांधल्या ? म्हणून दोन पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याला मारहाण केली तर सून सासूला चावली. या प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील येवला येथे नरहरी जोगदंड आणि त्यांचा सख्खा भाऊ सखाराम जोगदंड यांच्यात वीस वर्षा पूर्वी जमिनीच्या व घराच्या वाटण्या झालेल्या असताना देखील त्यांच्यात जमीन आणि घराच्या वाटण्या वरून अनेक वेळा भांडणे होत असतात.
दि. ९ जुलै रोजी नरहरी जोगदंड यांनी त्यांच्या म्हशी या पडकामध्ये बांधलेल्या असताना त्यांचा भाऊ सखाराम जोगदंड याने सोडून दिल्या. म्हणून म्हशी पुन्हा बांधण्यासाठी नरहरी जोगदंड व त्यांची पत्नी सिंधू जोगदंड हे सखाराम जोगदंड यांच्या घरा समोरून जात असताना भाऊ सखाराम, त्याचा मुलगा श्रीराम जोगदंड आणि विक्रम जोगदंड, भावाची सून केशरबाई असे तेथे आले. म्हशी बांधण्यावरून त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाली. त्या वेळी पुतण्या श्रीराम जोगदंड याने त्यांना चापट मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुसरा पुतण्या विक्रम जोगदंड याने काठी डोक्यात मारून डोके फोडले. नंतर सून केशरबाई श्रीराम जोगदंड ही नात्याने सासू असलेल्या सिंधुबाई जोगदंड हिच्या हाताला चावली आणि दुखापत केली.
नरहरी जोगदंड यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात भाऊ सखाराम बापुराव जोगदंड पुतणे श्रीराम जोगदंड आणि विक्रम जोगदंड, यांच्यासह सून केशरबाई जोगदंड यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३७०/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे हे तपास करीत आहेत.