Bhagwanrao Lomte Smriti Award to Vitthal Wagh
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने प्रदान करण्यात येणारा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर झाला आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी साहित्य, संगीत, पत्रकारिता, राजकारण, क्रीडा, सिनेमा-नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा या पुरस्काराचे १४ वे वर्ष असून, ग्रामीण जीवनाचे वास्तव, मातीचा सुगंध, शेतकऱ्यांच्या कष्टांची कहाणी, श्रमजीवी माणसांचे सुख-दुःख आणि वऱ्हाडी बोलीची अस्सल गोडी आपल्या साहित्यकृतीतून प्रभावीपणे मांडणारे डॉ. विठ्ठल वाघ यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
लेखक, कादंबरीकार, नाटककार, संशोधक, कोशकार, चित्रकार आणि काव्यगायक अशा विविध क्षेत्रांत डॉ. वाघ यांनी ठसा उमटविला आहे. त्यांच्या साहित्यामुळे मराठी ग्रामीण साहित्याला स्वतंत्र ओळख आणि नवा आयाम मिळाला. ‘काया मातीत मातीत’, ‘कपाशीची चंद्रफुले’, ‘पाऊसपाणी’, ‘गावशिव’, ‘पंढरीच्या वाटेवर’, ‘वैदर्भी’, ‘साय’, ‘वृषभसूक्त’, ‘मातीचा झरतो डोळा’ आणि ‘मायबाप’ हे त्यांचे उल्लेखनीय कवितासंग्रह आहेत. ‘डेबू’ आणि ‘डेबूजी’ या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. चित्रपट गीतलेखन, पटकथालेखन तसेच ‘अंधारयात्रा’ या नाटकामुळेही त्यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. वाघ यांनी इंदूर येथे एम.ए. मराठीचे शिक्षण घेतले. संत गाडगे बाबा विद्यापीठ, नागपूर येथून ‘पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे. आपल्या पहाडी आवाजातील प्रभावी काव्यसादरीकरणामुळेही ते रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार आणि २५ हजार रुपये रोख असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार यशवंतराव गडाख पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, उल्हासदादा पवार, प्राचार्य रा. रं. बोराडे, पद्मश्री डॉ. यु. म. पठाण, प्रा. भास्कर चंदनशिव, पद्मश्री डॉ. सतीश आळेकर आणि डॉ. वासुदेव मुलाटे यांना प्रदान करण्यात आला आहे.
रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. प्रख्यात साहित्यिक व गांधीवादी विचारवंत प्राचार्य डॉ. विश्वास पाटील (शहादा) यांच्या हस्ते डॉ. वाघ यांचा सन्मान करण्यात येणार असून, ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख (बीड) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे तसेच सदस्य डॉ. प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, त्र्यंबक पोखरकर आणि राजपाल लोमटे यांनी केले आहे.