Beed district observes a complete shutdown over the Maratha reservation issue
बीड, पुढारी वृत्तसेवाः मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली येथे उपोषण करत आहेत. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, आष्टी, परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, शिरूर या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रमुख शहरांमधील बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती, तर दुसरीकडे विद्यार्थीच न आल्याने शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुट्टी मिळाली. बंददरम्यानच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वडवणीत शोले स्टाईल आंदोलन
वडवणी, पुढारी वृत्तसेवाः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वडवणी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी वडवणी शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने नेहमी गजबजणारी बाजारपेठ दिवसभर ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बंद दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण व समाजबांधव मोटारसायकलवर सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी शहरातील वातावरण दणाणून गेले होते. रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली.
यानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बीड-परळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वडवणी पोलिसांकडून प्रमुख चौक, बाजारपेठ आणि आंदोलनाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वडवणीत मराठा आंदोलकांनी आणखी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही आंदोलक चक्क पाण्याच्या टाकीवर चढले, 'शोले स्टाईल' आंदोलन करत त्यांनी सरकारविरोधात तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पाण्याच्या टाकीवर आंदोलक चढल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. पाण्याच्या टाकीवरून आंदोलकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वडवणी तालुका सकल मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सस्कारने आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. धारूरमध्ये व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धारूर, पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि.3) पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला किल्ले धारूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, कर्मचारी, कामगार तसेब नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे किल्ले धारूर शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिबा दर्शविण्यासाठी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार किल्ले धारूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील व्यापारी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपापली दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली. शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्याने नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश व्यवहार बंद राहिले.
शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, व्यापारी आस्थापना आणि इतर व्यवसायांनीही बंदला पाठिबा दिल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज किल्ले धारूरच्या वतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. 'मराठा आरक्षण आमच्या हक्काचे', 'मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिबा' अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला. मोटारसायकल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला एकजुटीने पाठिबा दर्शविला. यावेळी धारूर येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोटारसायकल रॅली अंतस्वालीच्या दिशेने गेवराई, पुढारी वृत्तसेवाः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतस्वाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी गेवराईतून मराठा बांधवांची मोटारसायकल रॅली उत्साहात रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. भगवे ध्वज आणि एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी गेवराई शहर दुमदुमून गेले. तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव मोटारसायकलींसह रॅलीत सहभागी झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवत ही रॅली अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाली. रॅलीदरम्यान करण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला दरम्यान, बीड जिल्हा बंदच्या आवाहनाला गेवराई शहरासह तालुक्यातील गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. त्यामुळे गेवराई शहरातील प्रमुख बाजारपेठांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
माजलगावात रास्ता रोको
माजलगाव, पुढारी वृत्तसेवाः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी माजलगाव शहरात गुरुवारी रास्ता रोको व माजलगाव शहर बंद आंदोलन करण्यात आले. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असताना माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परभणी रोड येथे समर्थकांनी रास्ता रोको केला. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर एकत्र येत मनोज जररांगे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. जरांगे यांच्या प्रकृतीची दिवसेंदिवस चिंता वाढत असताना सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकत्यांनी केली. तसेच उपोषणामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी अशीही मागणी करण्यात आली. रास्ता रोकोमुळे शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.