Beed district leads the state in voter revision
बीड, पुढारी वृत्तसेवा : विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात बीड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत २१ लाख ९३ हजार ८२७मतदारांपैकी १९ लाख ८० हजार १२७मतदारांपर्यंत पुनर्नोदणीचे अर्ज पोहोचविण्यात आले असून, ही कामगिरी २०.२८ टक्के इतकी आहे. याशिवाय प्राप्त झालेल्या अर्जापैकी सुमारे ७० टक्के अर्जाची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित मतदारांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अर्ज पोहोचविण्याची मोहीमही वेगाने सुरू आहे.
विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराकडून नव्याने अर्ज भरून घेतला जात असून, अद्ययावत छायाचित्रासह माहितीची नोंद केली जात आहे. हा कार्यक्रम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याने उर्वरित कामही निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४१६ बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत.
ज्यांच्यापर्यंत अद्याप अर्ज पोहोचलेले नाहीत, अशा मतदारांचा शोध घेण्याचे कामही समांतरपणे सुरू आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा समन्वयाने काम करत असून, राज्यातील सर्वाधिक वेगाने मतदार पुनरीक्षण पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
"बीड जिल्ह्यात विशेष मतदार पुनरीक्षणाचे काम अत्यंत समाधानकारक गतीने सुरू आहे. आतापर्यंत २० टक्क्यांहून अधिक मतदारांपर्यंत अर्ज पोहोचविले असून, सुमारे ६० टक्के अर्जाची ऑनलाईन नोंदणीही पूर्ण झाली आहे. २९ जुलैपूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून, एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत." -मनोज घोडे पाटील उपजिल्हाधिकारी बीड