Beed District And Sessions Court Pudhari
बीड

Beed Court Bomb Threat | बीड जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; मेलमुळे खळबळ

धमकीचा मेल मिळताच न्यायालयाची इमारत रिकामी; पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Beed District And Sessions Court

बीड : बीड जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालयीन इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या मेलमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी तसेच पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी न्यायालय परिसरात दाखल झाले. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांकडून इमारतीच्या प्रत्येक भागाची तपासणी केली जात आहे. धमकीचा ई-मेल कोठून आणि कोणी पाठविला, याचाही तपास सुरू आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी न्यायालयाची इमारत रिकामी करून तपासणी सुरू असल्याची माहिती दिली. तपासणीनंतर या धमकीच्या मेलमागील सत्य स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT