One bull dead in Beed
दिंद्रुड: धारूर तालुक्यातील फकीर जवळा येथील शेतात बुधवारी ( दि. १) बैलगाडी विहिरीत पडल्याने एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेतमजूर आणि दुसरा बैल बचावला. बैल आणि बैलगाडी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.
घटनेनुसार, दिंद्रुड पंचक्रोशीतील शेतकरी त्रिंबक बालासाहेब साबळे यांचा शेतमजूर भास्कर शिंदे यांनी गावालगत असलेल्या गट क्रमांक १० मधील शेतात ओढ्याच्या कडेने बैलगाडी नेली. अचानक बैलांचा संतुलन बिघडल्याने बैलगाडी जुन्या विहिरीत पडली. त्यात एक बैल गाडीखाली अडकून मृत्यूमुखी पडला, तर मजूर आणि दुसरा बैल वाचले.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांचा मोठा जमाव घटनास्थळी पोहचला. जेसीबीच्या साह्याने बैल आणि बैलगाडी बाहेर काढण्यात आले.
अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले असून, या अपघातामुळे शेतकऱ्याला आणखी आर्थिक हानी झाली आहे. तलाठी पुजा आठवले आणि कृषी सहायक पी. गवारे यांनी सरपंच व ग्रामस्थांसमोर पंचनामा केला. प्रशासनाकडून शेतकऱ्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.