Beed Accident Pudhari
बीड

Beed Accident : धामणगावात उसाचा भरधाव ट्रक थेट घरात घुसला; क्षणात संसार उद्ध्वस्त!

सुदैवाने जीवितहानी टळली; घराची भिंत, स्वयंपाकघरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कडा : आष्टी तालुक्यातील बारामती-पैठण महामार्गावरील धामणगाव येथे आज सकाळी भीषण अपघात घडला. धामणगाव-पाथर्डी रस्त्यावरील लोखंडे-चौधरी वस्ती परिसरात सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेला भरधाव ट्रक थेट एका घरात घुसला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र घराचे आणि घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दिगांबर दत्तात्रय औटे यांच्या घरात घुसला. ट्रकची जोरदार धडक बसल्याने घराची भिंत कोसळली, तर स्वयंपाकघराचेही मोठे नुकसान झाले. याशिवाय घरातील भांडी, फर्निचर आणि इतर संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. या अपघातात ट्रकचेही नुकसान झाले असून, वाहतुकीसाठी नेला जात असलेला ऊस आणि संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यालाही आर्थिक फटका बसला आहे.

पहाटेच्या शांत वातावरणात अचानक झालेल्या जोरदार धडकेने परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रक थेट घरात घुसल्याचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकही हादरून गेले. सुदैवाने अपघाताच्या वेळी घरातील सदस्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, ट्रकची धडक अधिक गंभीर ठरली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर

या अपघातामुळे औटे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या संसारावर संकट कोसळले आहे. घराचे आणि घरातील साहित्याचे नुकसान भरून कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT