केज : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून केज येथील तत्कालीन नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर तहसील कार्यालयात कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी मधुकर वाघ याला १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर दुसरा आरोपी महेबुब जहूर शेख याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२२ रोजी सुमारे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केज तहसील कार्यालयात तत्कालीन नायब तहसीलदार आशा वाघ या शासकीय कामकाज करत होत्या. त्या वेळी आस्थापना विभागात महसूल सहाय्यक शीतल रोडगे, शिपाई रेणुका गुंजेगावकर आणि कोतवाल कोमल म्हेत्रे उपस्थित होते. दरम्यान, आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ हा तोंडाला टॉवेल बांधून आणि हातात खाकी रंगाची बॅग घेऊन कार्यालयात आला. त्याने काही कागदपत्रे आणि हिरव्या रंगाची फाईल त्यांच्या समोर ठेवली.
आशा वाघ कागदपत्रे पाहत असताना मधुकर वाघ याने बॅगेतून धारदार लोखंडी कोयता काढून त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर कोयत्याचे सहा वार केले तसेच खांद्यावर आणि हातांवरही वार केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी हात आडवा केल्याने त्यांच्या मनगटाला आणि बोटांना गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांनी जीव वाचवत संजय गांधी विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सहकाऱ्यांनी आणि त्यांचे पती बंटी वाघमारे यांनी त्यांना तातडीने केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे तसेच नंतर लातूर येथील लहाने रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर केज पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी लातूर येथे रुग्णालयात जाऊन आशा वाघ यांचा जबाब नोंदवला. त्यानुसार दि. ७ जून २०२२ रोजी मधुकर वाघ याच्यासह तपासाअंती महेबुब जहूर शेख याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी तपास पूर्ण करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, केज येथे दोषारोपपत्र दाखल केले.
उपलब्ध पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा विचार करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी निकाल देत मुख्य आरोपी मधुकर वाघ याला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तर दुसरा आरोपी महेबुब शेख याचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध न झाल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात फिर्यादी आशा वाघ यांच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. प्रशांत गिरी यांनी काम पाहिले. आरोपी मधुकर वाघ यांच्या वतीने ॲड. कवडे, तर महेबुब शेख यांच्या वतीने ॲड. इस्माईल शेख यांनी बाजू मांडली. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतरपासून मुख्य आरोपी मधुकर वाघ हा न्यायालयीन कोठडीत होता. त्यामुळे सुमारे पावणे चार वर्षांचा कारावासाचा कालावधी हा अंडरट्रायल म्हणून गणला जाऊन त्याला शिक्षेत काही प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता असल्याचे समजते.