परळी वैजनाथ : सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तब्बल 23 लाख 42 हजार 888 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
सायबर पोलीस ठाणे, बीड येथे दाखल गुन्ह्यानुसार परळी वैजनाथ येथील तक्रारदार सूर्यकांत निवृत्ती मुंडे यांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून ऑनलाइन माध्यमातून मोठी रक्कम उकळण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये रोख जप्त केले असून, आणखी 3.20 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले आहेत. आरोपी फसवणुकीतून मिळालेली रक्कम ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत जळगाव येथून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रसन्न अजय कासट (वय 31),स्वाती प्रसन्न कासट (वय 26), संकेत दीपक बेलदार (वय 22) यांचा समावेश आहे.या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का, तसेच इतर किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “डिजिटल अरेस्ट”सारख्या खोट्या धमक्यांना बळी पडू नये. पोलीस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाहीत. अशा प्रकारचे कॉल आल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. ही कारवाई पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.