जालिंदरनाथ देवस्थानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत दिसले आहेत.  
बीड

Beed Crime | येवलवाडीतील जालिंदरनाथ देवस्थानात धाडसी चोरी!

दोन वजनदार दानपेट्या घेऊन चोरटे फरार; पाटोदा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

कडा :- शिरूर कासार तालुक्यातील तिर्थक्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान (येवलवाडी)येथे मंगळवार दि.३ च्या मध्यरात्री तब्बल १० ते १५ लाखांच्या चोरीचा थरार उघडकीस आला. नाथपंथीयांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवळातील दोन सप्तधातूच्या वजनदार दानपेट्या चोरट्यांनी अक्षरशः खांद्यावर टाकून नेल्या आणि काही अंतरावरील भोसले वस्तीजवळ फोडून रक्कम लंपास केली.

सिसीटीव्हीत तीन चोरटे स्पष्ट...

चोरांनी देवळात प्रवेश करताना आतल्या कॅमेऱ्यांची वायर कापली; मात्र बाहेरील कॅमेऱ्यांनी त्यांच्या हालचाली टिपल्या आहेत.तीन चोरटे दानपेट्या उचलून नेताना स्पष्ट दिसत असून त्यादृष्टीने तपासाची उपयुक्त दिशा होऊ शकते.

पुजारी व भाविक मुक्कामास; तरीही चोरी...
घटनेच्या दिवशी रात्री गाभाऱ्यात पुजारी दशरथ येवले झोपले होते तसेच दानपेट्यांच्या जवळच दोन भाविक मुक्कामाला होते. देवस्थानात कधी साधी चप्पलही चोरी न जाणारे वातावरण; पण यावेळी चोरट्यांनी दोन जड पेट्या सहज उचलून नेल्याने भाविकांमध्ये आश्चर्य व संतापाची लाट आहे.

पोलिसांची संथगतीने तपास..

पाटोदा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पाहणी करून पंचनामा केला;मात्र गुन्हा दाखल करण्यास रात्री उशिरापर्यंत विलंब होत असल्याने पोलिसांचे या गंभीर चोरीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरात जोर धरत आहे.

भाविकांची मोठी गर्दी; तर्कवितर्कांना ऊत...

सकाळी चोरीची माहिती पसरताच येवलवाडी व रायमोह परिसरातील भाविकांनी देवळात मोठी गर्दी केली."कधीही चोरी न होणाऱ्या देवस्थानातून दोन दानपेट्या गायब कशा?असा प्रश्न भक्तांनी भीती व्यक्त केली आहे.

देवस्थान प्रशासन व पोलिसांना आव्हान...

या धाडसी चोरीने देवस्थान प्रशासनाबरोबरच स्थानिक पोलिसांच्या सुरक्षिततेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गरजेच्या सर्व तपासयंत्रणे मार्फत तातडीने तपास करावा अशी भाविकांची मागणी आहे.

जालिंदरनाथ मंदिरातील दानपेटीची चोरी होऊन चार दिवस झाले तरी तपास लागत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तपास हाती घेऊन लवकरात लवकर भुरट्या चोरांचा तपास करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नाथभक्त सामाजिक कार्यकर्ते श्रीराम येवले यांनी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT