गेवराई : गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता एक गंभीर मारहाण प्रकरण घडले. किरकोळ वादावरून आठ जणांनी तिघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी रात्री किरकोळ वाद झाल्यानंतर जावेद जब्बार सय्यद यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे जावेद यांना राग आला आणि त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी रविवारी सकाळी घरासमोर येऊन त्यांना बाहेर बोलावले. आरोपींनी जावेद यांना "तू पोलिस ठाण्यात तक्रार का केली?" असा प्रश्न विचारत काठ्यांनी बेदम मारहाण सुरू केली. याचवेळी पायावर चाकूचा वार देखील करण्यात आला.
मारहाणीत जावेद सय्यद यांचे वडील जब्बार शेख आणि पत्नी सुमय्या जावेद सय्यद यांनाही आरोपींनी मारहाण केली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेऊन त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जावेद सय्यद यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात मारहाण, जिवे मारण्याची धमकी देणे आणि संगनमत यासाठी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चकलांबा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, जखमींनी सांगितले की, आरोपींना अटक न झाल्यास ते पोलिस अधिक्षकांना भेटून न्याय मागणार आहेत.