गेवराई : गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या चार विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका शिक्षकावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांनी शाळेत जाऊन विचारला जाब
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुखा मसला येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अविनाश ढेरे यांच्यावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. १२ तारखेपासून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
शाळेतून घरी परतल्यानंतर संबंधित चार विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. पुढे त्याला गेवराई पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी
या घटनेची माहिती परिसरात पसरताच पोलीस ठाण्याच्या परिसरात पालक, नागरिक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करत संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले. पालकांच्या तक्रारीवरून संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे कदम करीत आहेत. या घटनेमुळे गेवराई तालुक्यात संताप व्यक्त होत असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.