गेवराई : चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या टीमने अवैध धंद्यावरील कारवाया आणखी गतिमान केल्या असून शुक्रवारी (दि.१०) गांज्याची शेतीच पोलिसांनी उघडकीस आणली आहे.या कारवाईत तब्बल ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरळेगावच्या गट ११३ मधील उसाच्या शेतात गांज्याची लागवड करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमला पाठवून खात्री केली असता उसाच्या शेतात गांज्याची लहान मोठी अशी २५३ झाडे लावल्याचे समोर आले.
यात काही झाडांचे वजन १८४.४ किलो असून त्याची किंमत ४८ लाख १० हजार व ४ किलो ३०० ग्रॅम सुका गांजा ज्याची किंमत २ लाख ६ हजार ४०० रुपये तसेच ४५० ग्रॅम निमसुका गांजा ज्याची किंमत ११ हजार २५० रुपये असून एकूण ४८ लाख २७ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी मनोज उर्फ बादल भगवान आंधळे (वय-३६,रा.नगदनारायण वस्ती,सुरळेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर,सहाय्यक फौजदार सोमनाथ कुलकर्णी, पोल्सी हवालदार विश्वनाथ प्रधान, नरेंद्र बांगर, हनुमंत इंगोले, संदीप गायकवाड,प्रशांत घोंगडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.