Beed Crime वडवणीत एसबीआयचे एटीएम गॅस कटरने फोडले; ११ लाख ३३ हजारांची रोकड लंपास! 
बीड

Beed Crime | वडवणीत एसबीआयचे एटीएम गॅस कटरने फोडले; ११ लाख ३३ हजारांची रोकड लंपास!

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारून चोरट्यांचा धाडसी डाव; रोकड असलेली कॅसेटच घेऊन पोबारा, शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

वडवणी : वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडून तब्बल ११ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापले आणि त्यातील रोकड असलेली कॅसेटच घेऊन पोबारा केला. शहरातील मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या चौकात घडलेल्या या घटनेमुळे वडवणी शहरात एकच खळबळ उडाली असून बँकिंग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) एटीएम आहे. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या एटीएमला लक्ष्य केले. चोरीचा डाव साधताना चोरट्यांनी सर्वप्रथम एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून आतील रोकड ठेवलेली कॅसेट बाहेर काढली. त्यामधील रोख रकमेसह कॅसेट घेऊन चोरटे पसार झाले.

नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या चोरीमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. फिर्यादी कैलाश चांदोबा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या रकमेमध्ये १०० रुपयांच्या १ हजार ७३४ नोटा असून त्यांची एकूण किंमत १ लाख ७३ हजार ४०० रुपये आहे. तसेच ५०० रुपयांच्या १ हजार ९२० नोटा असून त्यांची किंमत ९ लाख ६० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एटीएममधून एकूण ११ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. संबंधित एसबीआय एटीएमचा आयडी क्रमांक T1NW020028042 असा असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे शहरातील बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून, गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडून रोकड असलेली कॅसेटच घेऊन जाण्यापर्यंत चोरट्यांनी मजल मारल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकात असलेल्या एटीएममध्ये एवढी मोठी चोरी घडल्याने या घटनेचा तपास वेगाने करून चोरट्यांचा शोध घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

सीसीटीव्हीत चोरटे कैद; तोंडाला रुमाल, अंगावर चादर घेऊन चोरी

अज्ञात चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. चोरट्यांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधलेला, तर अंगावर चादर घेतलेली दिसून येत आहे. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT