अंबेजोगाई : फोनपेवरून ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी अविनाश देवकर आणि अझर पठाण या दोघा आरोपींना केवळ दोन तासांत अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून ७४ हजार रुपये जप्त केले आहेत. पोलिसांच्या या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळकानडी (ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी आणि व्यवसायाने गॅरेज चालक असलेले सोमनाथ मदन ढगे यांची ८४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. अंबाजोगाईतील अविनाश शंकर देवकर (रा. वडारवाडा) आणि अझर अब्दुल रहमान पठाण (वय ३२, रा. पेन्शनपुरा) या दोघांनी मिळून फोनपेवरून ही रक्कम फसवणूक करून काढून घेतली. याप्रकरणी सोमनाथ ढगे यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात २२ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींविरुद्ध यापूर्वीही जबरी चोरी व अन्य गुन्ह्यांचे गुन्हे अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात नोंदवलेले आहेत. या गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलिस उपनिरीक्षक शिंदे, तसेच पोलिस अंमलदार श्रीकृष्ण वडकर, मनोज घोडके, रवीकुमार केंद्रे, हनुमंत लाड, हनुमंत चादर, पांडुरंग काळे आणि भागवत नागरगोजे यांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच फसवणुकीत गेलेले ७४,००९ रुपये हस्तगत केले. अंबाजोगाई शहर पोलिसांनी केलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.