Beed Crime news  
बीड

Beed Crime news | दारु, संगीत बारीच्या नादात बीड जिल्ह्यातील आणखी एका तरुणाने जीव गमावला

सोबत असलेल्या मित्रांनीच दारू पाजून केली रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी असलेले आणि औषध विक्रेता असलेला एक तरुण मित्रासोबत धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रावर गेले. कला केंद्रावर जाण्यापूर्वी रस्त्यात ते सर्वजण दारू पिले. त्यानंतर कला केंद्रावरून परत येत असताना मध्यरात्री त्यांच्या छातीत आणि पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा जीव गेल्यानंतर प्रेत त्याच गाडीतून घरी आणून टाकले असल्याची धक्कादायक घटना घडली. मयत तरुणाच्या वडिलांचा फिर्यादी वरून त्याच्या पाच मित्रांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील साळेगाव तालुका केज येथील महाराष्ट्र मेडिकलचे औषध विक्रेते सतीश भागवतराव मुंडे वय (३७ वर्ष) हे दि. १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्रा सोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे महाकाली कला केंद्रावर नर्तिकींचा नाच-गाणे पाहण्यासाठी शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी यांच्या स्विफ्ट डिझायर कार मधून गेले होते. कला केंद्रावर जात असताना त्यांनी साळेगाव येथील बारमध्ये दारू पिले. नंतर कळंब आणि येरमाळा येथील एका धाब्यावर दारू पिले. त्यानंतर रात्री १२:१५ वा. जे पर्यंत ते कला केंद्रात होते. त्या नंतर दि. १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते गावाकडे परत येत असताना दुसऱ्या एका गाडीतील त्यांच्या ओळखीच्या तरुणांनी गाडी रस्त्यात थांबवून जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी संगनमत करून सतीश मुंडे यास छातीत व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यातच सतीश मुंडे यांचा मृत्यू झाला.

सतीश मुंडे याचा मृत्यू झाल्यानंतर स्विफ्ट चालक शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी याने रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास सतीश मुंडे याला त्याच कारमधून साळेगाव येथे त्याच्या घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर सतीश मुंडे यांच्या आई वडीलांना त्याने सांगितले की, सतीश मुंडे हा खूप दारू पिलेला असल्याने तो बेशुद्ध पडला आहे. सतीश मुंडे यांच्या वडिलांनी सतीश यास आवाज दिला असता त्याने काही हालचाल केली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. भाऊ आणि पुतण्या यांच्या मदतीने सतीश याला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. परंतु तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना अंबाजोगाई येथे जाण्याचा सल्ला दिला. अंबाजोगाई येथे सतीश मुंडे याला घेऊन गेल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीश मुंडे मयत झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर मयत सतीश मुंडे यांचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी येरमाळा जि. धाराशिव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे (सर्व रा. साळेगाव ता. केज जि. बीड) यांच्या विरुद्ध गु र नं ३८/२०२६ भा न्या सं १०३, १९१(२),११५(२) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या भालू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे हे तपास करीत आहेत.

पत्नी फोन करीत होती पण फोन उचलला नाही

मयत सतीश मुंडे यांची पत्नी सौ. दीपाली ही रात्री १०:०० वाजल्या पासून पती सतीश यास फोन करीत होती परंतु तो फोन उचलीत नसल्याने तिने मुंबई येथे राहत असलेले सतीशचे चुलते आणि तिचे चुलत सासरे इंदर मुंडे यांना फोन करून फोन उचलत नसल्याचे सांगितले. म्हणून मग इंदर मुंडे यांनी सतीश यास अनेक वेळा फोन केला परंतु कोणी उत्तर देत नव्हते. त्या नंतर रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास इंदर मुंडे यांनी सतीश याच्या फोनवर केलेला फोन उचलला आणि सतीश हा जास्त दारू पिल्याने तो हालचाल करीत नसल्याचे सांगितले.

जुन्या भांडणावरून मारहाण झाल्याचा संशय

दत्ता तोंडे आणि सतीश मुंडे यांच्या कुटुंबात पूर्वी झाले होते भांडण सतीश मुंडे आणि दत्ता तोंडे यांच्यात मागील १०/१२ वर्षा पूर्वी भांडण व हाणामारी झाली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून सतीश यास मारहाण झाली असावी आणि वर्मी मार लागल्याने सतीश मुंडे याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे.

कला केंद्र पुन्हा चर्चेत

काही दिवसांपूर्वी बार्शी येथील नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात अडकलेल्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली होती. त्या नंतर सतीश मुंडे यांच्या हत्ये नंतर पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी येथील महाकाली कला केंद्र चर्चेत आले आहे.

मारहाणीत आणखी काहीजण असल्याचा संशय

सतीश मुंडे याला मारहाण करताना पाच आरोपी व्यतिरिक्त आणखीही काही आरोपी असल्याचा संशय असून पोलिस त्याचा तपास घेत आहेत.सतीश मुंडे याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्या नंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सतीश मुंडे याचे प्रेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात असताना आणि त्याचे शवविच्छेदन होण्यापूर्वीच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यानी तपास सुरू केला होता. पोलिस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांनी अंबाजोगाई येथे जाऊन चौकशी करीत होते. तर पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी संशयित आरोपींना केज पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरू केली होती. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी येरमाळा आणि चोरखळी येथे जाऊन तेथील हॉटेल, बार आणि कला केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन पुरावे नष्ट होण्या पूर्वीच ताब्यात घेतले. परंतु घटना ही धाराशिव जिल्ह्यातील असल्याने सतीश मुंडे यांच्या खुनाचा गुन्हा येरमाळा पोलिस ठाण्या दाखल झाला आहे.

सतीश मुंडे याचे कुटुंब उघड्यावर

सतीश मुंडे या त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तर सतीश मुंडे याला सात वर्षाचा एकच मुलगा आहे. सतीश मुंडे यांच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT