सुभाष मुळे
गेवराई : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी गेवराई तालुक्यातील प्राथमिक शाळा कोळगाव केंद्रप्रमुखाविरुद्ध कारवाई केली आहे. गोविंद सुखदेव शेळके (वय ५६, व्यवसाय- नोकरी) रा. धारवंटा, ता. गेवराई, जि. बीड यांने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांना आरोपी शेलके यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेसंबंधी कामासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्याकडे सांगितला. त्यानंतर विभागाने प्राथमिक तपास केला असता, आरोपीने लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरुद्ध सापळा रचण्यात आला. मात्र आरोपी त्या ठिकाणी हजर झाला नाही. तरीसुद्धा त्याने मागणी नाकारली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २० सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये कलम ७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई माधुरी कांगणे (पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक शशीकांत शिंगारे, उपअधीक्षक (बीड) श्री. सोपान चिट्टपपल्ले, समाधान कवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक राहुल भोळ, समाधान कवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सांगळे, पोलिस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचकुंडे, अनिल शेळके, अमोल खरसाडे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, अंबादास पुरी, गणेश म्हेत्रे या बीड पथकाने कार्यवाही केली. शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या गोविंद शेळके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.