gutkha seizure Pudhari Photo
बीड

Beed Crime News | मस्साजोग शिवारात १० लाखांचा गुटखा साठा जप्त

सहायक पोलिस अधीक्षकांची कारवाई; गुटखामाफिया रोहित देशमुख फरार

पुढारी वृत्तसेवा

केज : केज तालुक्यात गुटखा माफियांनी मुजोरी वाढलेली असतानाच, सहायक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या विशेष पथकाने मसाजोग शिवारात मोठी कारवाई केली आहे. एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला तब्बल १० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी तस्करांविरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे.

मसाजोग येथील रोहित आसाराम देशमुख याने काळेंगावघाट रस्त्यावरील रंजित बाजीराव देशमुख यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा मोठा साठा लपवून ठेवल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. १७ एप्रिल रोजी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने या शेडवर अचानक धाड टाकली. झडती घेतली असता, तेथे पांढऱ्या, निळ्या आणि गुलाबी रंगाच्या पोत्यांमध्ये तसेच खोक्यांमध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला.

पोलिसांनी १० लाख रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी रोहित देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कारवाईची चाहूल लागताच आरोपी रोहित देशमुख फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच केजमध्ये गुटखा माफियांच्या दहशतीचा एक गंभीर प्रकार समोर आला होता. १४ एप्रिल रोजी मोहसिन कुरेशी या प्राथमिक शिक्षकावर मुजाहिद खैरूमिया कुरेशी आणि आबुजर खैरूमिया कुरेशी या दोन गुटखा माफियांनी 'फायटर'ने जीवघेणा हल्ला केला होता. तू पोलिसांना गुटखा तस्करीची माहिती दिलीस, त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले, या संशयावरून हा हल्ला करण्यात आला होता.

या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त होत असून, पीडित शिक्षकाने गुटखा माफियांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. या हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, मसाजोग येथील कारवाई हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. दरम्यान पोलिसांचा कडक इशारा गुटखा विक्री आणि तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांवर यापुढेही सातत्याने कारवाया सुरू राहतील आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT