गौतम बचुटे
केज : पती कामासाठी पुण्यात आणि पत्नी गावी एकटी राहत असल्याचा गैरफायदा घेऊन एका नराधमाने विवाहितेचा सहा ते सात महिने छुपा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे दाद मागितल्यानंतर, चौकशीअंती संशयित आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाधित महिलेचा पती आणि चार मुली उदरनिर्वाहासाठी व शिक्षणासाठी पुणे येथे राहतात. ही महिला तिच्या एका लहान मुलीसह केज तालुक्यातील गावात वास्तव्यास आहे. ती गावात एकटी राहत असल्याची संधी साधून गावातील प्रदीप चंदनशिव याने जून २०२४ पासून तिचा छुप्या पद्धतीने पाठलाग करण्यास सुरुवात केली. ती शेतात कामाला जाताना किंवा घरगुती कामासाठी बाहेर पडल्यावर तो सतत तिचा पिच्छा पुरवून तिला मानसिक त्रास देत असे. एकटी आणि असहाय असल्याने सुरुवातीला तिने हा त्रास मुकाट्याने सहन केला.
काही काळानंतर पीडित महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी पुण्याला गेली असता, तिने घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. जानेवारी २०२५ मध्ये या दाम्पत्याने पुणे येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हे प्रकरण केज पोलिसांकडे वर्ग केले. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश (सुकुमार) बनसोडे यांनी या प्रकरणाची सखोल आणि प्राथमिक चौकशी केली. चौकशीत तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला.
अखेर या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी प्रदीप चंदनशिव याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७८(१) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे स्वतः करीत आहेत.