गेवराई : अवैध धंद्यांविरोधात गेवराई पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडण्यासह शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही कारवायांत हायवा, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ३२ लाख ३९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या.
संगमजळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूची चोरी करून हायवाद्वारे गेवराईकडे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांनी नदीपात्रात कारवाई केली. यावेळी पिवळ्या रंगाचा विनानंबरचा भारत बेंझ हायवा आढळून आला. चालक दादाराव दत्तू राठोड (वय ३२, रा. रामनगर तांडा, कुंभेजळगाव, ता. गेवराई) याच्याकडे वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळले. पोलिसांनी हायवासह २५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ३०३ (२) तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ च्या कलम ४ व २१ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास गेवराई शहरातील जालना रोडवरील जमादारनी पुलाजवळ चार्वक हॉटेलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी संतोष दादासाहेब बारगजे, संतोष आप्पासाहेब नेवाळे, शेख गफार अब्दुल रेहमान, कदीर निजामुद्दीन शेख, अर्जुन गिताराम धुतडमल, भरत श्रीरंग इंगोले, सुभाष गोपीनाथ भावले, ज्ञानेश्वर आसाराम वादे, संजय निवृत्ती सुतार आणि मजहर आबुदीन शेख (सर्व रा. गेवराई) या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोख रक्कम, दहा मोबाईल आणि सहा मोटारसायकली व स्कुटी असा एकूण ७ लाख १५ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाया पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. वाळू वाहतूक प्रकरणात पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे, पोलीस उपनिरीक्षक खोत, पोलीस हवालदार अशोक हंबर्डे आणि पोलीस अंमलदार गोरक्ष डोके यांनी सहभाग घेतला. तर जुगार अड्ड्यावरील कारवाईत पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड, पोलीस उपनिरीक्षक उदगिरकर, पोलीस हवालदार अशोक हंबर्डे, पोलीस हवालदार घोलप, पोलीस अंमलदार गोरक्ष डोके आणि पोलीस हवालदार (चालक) सांगळे यांनी सहभाग घेतला.