माजलगावच्या करवा पेट्रोल पंपावर मद्यपेयी तरुणांचा धुडगूस 
बीड

Beed Crime : माजलगावच्या करवा पेट्रोल पंपावर मद्यपेयी तरुणांचा धुडगूस

दमदाटी करत गाडीत पेट्रोल भरण्याचा प्रयत्न;तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : शहरालगत असलेल्या करवा पेट्रोल पंपावर काही तरुणांनी धुडगूस घालत लागलेल्या रांगेत न येता दमदाटी करत गाडीत पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि.११) रात्री ११:३० वाजता घडली. याप्रकरणी तिघांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित ३ तरुण मोटार सायकलवर पेट्रोल पंपावर आले व त्यांनी रांगेत न येता गाडीत पेट्रोल भरण्यासाठी कर्मचाऱ्यांची वाद घालत, आरेरावी करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल भरण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद पुढे वाढला आणि तरुणांनी पंप परिसरात गोंधळ घालत दादागिरी केल्याचा आरोप फिर्यादी कर्मचाऱ्याकडून करण्यात आला आहे. तसेच या तरुणांनी कर्मचाऱ्याकडून पेट्रोल सोडणारा पंप जबरदस्तीने हिसकवून घेत स्वतःच्या गाडीत पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केल्याचाही प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे काही काळ पंप परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान कर्मचारी सचिन दत्तात्रेय नरसाळे यांच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान आदिल आणि रेहान अशी पूर्ण नाव माहित नसलेले दोन तरुण काल दुपारपर्यंत पोलिसांनी निष्पन्न केले असून तिसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक माकने हे करत आहेत. दरम्यान पेट्रोल पंपावर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होईपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेव ठेवणार असल्याचे पंपचालकानी सांगितले.

गोंधळ करणाऱ्यांमध्ये नगरसेवकाचा भाऊ ?

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गोंधळ करणाऱ्यामध्ये एक नगरसेवकाचा भाऊ असून त्याने व त्याच्या साथीदारांनी हा प्रकार केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT