बीड : बीड शहरातील बँक ऑफ बडोदाच्या दोन शाखांमध्ये बनावट सोने गहाण ठेऊन तब्बल १ कोटी ३६ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज उचलणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी १५ खातेदार आणि ३ सराफ व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी सराफ विलास उदावंत याला बीड शहर पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे.
बँकेकडून सोन्याच्या तारणावर कर्ज देण्यात येते. यासाठी सोने खरे आहे की खोटे, याची पडताळणी करण्यासाठी बँकेने विलास उदावंत, प्रविण शेडुते आणि किशोर भरडे या तिघा सराफांची नेमणूक केली होती. या तिघांनी मिळून बँकेची फसवणूक केली. पहिल्या तपासणीत विलास आणि प्रविण यांनी सोने तपासले, तर दुसऱ्या खात्रीसाठी किशोर भरडे याने प्रमाणपत्र दिले. दोनदा तपासणी करून सोने खरे असल्याचे सांगण्यात आले आणि बँकेने कर्ज मंजूर केले. मात्र, नंतरच्या तपासणीत संपूर्ण सोने बनावट असल्याचे उघड झाले ! बँकेला संशय आल्यानंतर अहिल्यानगर येथील नामांकित सराफाकडून पुन्हा एकदा सोन्याची तपासणी करण्यात आली. त्यात १५ खातेदारांचे सोने पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. मुख्य आर-ोपी विलास उदावंत याने यापूर्वीही स्वस्तात सोने देतो असा सापळा रचून अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी होत्या. तरीदेखील त्याच्याकडून सोने तपासणीचे काम घेतल्याने बँकेच्या दक्षतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अभिषेक बेद्रे, अमोल गवळी, आनंद कुकडेजा, अनिल गिरी, अन्वर अख्तर अली, श्रीकृष्ण हवाले, महेश बेद्रे, प्रीत कुकडेजा, संभाजी चौरे, गुलाब शेख, महेबुब मलीक, पठाण रशीद, रिझवान शेख, किरण ठाकरे, सविता बेद्रे, तसेच सराफ विलास उदावंत, प्रविण शेडुते आणि किशोर भरडे. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात व कट रचल्याचे कलम लावून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत सराफ आणि खातेदार यांच्यात संगणमत असल्याचे स्पष्ट झाले.