Sand Theft Case Pudhari
बीड

Beed Crime News | घरकुलधारकांच्या वाळूवर डल्ला मारणाऱ्यांना कायद्याचा दणका

दोन तलाठी, महसूल, पोलिस कर्मचाऱ्यासह 19 जणांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : घरकुलधारकांसाठी असलेली वाळू महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगणमत करत परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार गेवराईत घडला होता. या प्रकरणात आ.विजयसिंह पंडित यांनी आवाज उठवल्यानंतर आता गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन दोन तलाठी, महसूल, पोलिस कर्मचारी, सरपंच, उपसरपंचांसह 19 जणांवर शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, बेकायदेशीर उत्खनन, शासनाची फसवणूक, गुन्हेगारी स्वरुपाचा कट आदि कलमान्वये चकलांबा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातून जिल्हाभरातील अठराशे घरकुल धारकांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू दिली जाणार होती. याकरिता उत्खनन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. परंतु यामधील अनेक घरकुलधारकांनी आपली बांधकामे यापूर्वीच पुर्ण केली होती तर काहींची सुरु होती. ही संधी साधत महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व खासगी व्यक्तींनी एकत्रितपणे कट रचत हजारो ब्रास अधिकचा वाळू उपसा या पात्रातून केला. याबरोबरच ज्यांच्या नावे ही वाळू दिली जाणार होती, त्यांना खोटी कारणे सांगून अथवा पैशाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून ओटीपी घेत ही वाळू जास्त दरात इतर ठिकाणी विक्री केली होती.

या सर्व प्रकरणात गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आवाज उठवत तक्रार केली होती. यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी दहा पथके स्थापन करत तसेच गोदावरी पात्राची ईटीपी मोजणी करत अहवाल मागवला होता. प्राप्त झालेल्या अहवालामध्ये दोषी आढळलेल्या तलाठी, महसूल कर्मचारी तसेच सरपंच, उपसरपंच व खासगी व्यक्ती अशा 19 जणांच्या विरोधात कलम कलम 61(2)(अ), 305(ई), 316(5), 318(4), 336(3), 340(2), 3(5) बी.एन.एस सह कलम 66(), 66() आय.टी.ॲक्ट व कलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कलम 3(1) लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा (पी.डी.पी.पी ॲक्ट) 1984 नुसार चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहेत.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

1. गोविंद ढाकणे, ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, गेवराई, 2. किरण दांडगे, ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, गेवराई, 3. विश्वजीत शेंबडे पाटील, खाजगी संगणक चालक, तहसिलकार्यालय, गेवराई, 4. शुभम गायकवाड, महसूल सेवक, तहसिल कार्यालय, गेवराई, 5. गोविंद दिलीप मगर रा धुमेगाव ता.गेवराई, 6. योगेश दिलीप मगर रा.धुमेगाव ता.गेवराई, 7. अशोक चवकर, 8. मुकेश उद्धव बोराडे उपसरपंच गंगावाडी, 9. दादासाहेब रमेश माळी रा. बेलगाव, 10. यासीन तांबोळी रा. हिरापूर ता.गेवराई, 11. अमोल अप्पासाहेब लाखे रा. एरंडगांव ता.गेवराई जि.बीड, 12. शितल शिवाजी धोंडरे, सामाजिक कार्यकर्ता, रा. देवी मंदिराजवळ जातेगाव, भागवत राधाकिसन जाधव, सरपंच मौजे बेलगुडवाडी ता. गेवराई, 14. कल्याण पवार (पोलीस) रा.उमापूर ता.गेवराई, के.एम.पवार रा. उमापूर ता.गेवराई, सोहेल सोदागर रा. उमापूर, शाहरुख मुसा पठाण, अजय चाळक ग्रामपंचायत सेवक, बाबासाहेब तुकाराम सांगळे रा.भायाळ ता.पाटोदा जि.बीड

तहसीलदारांवर झाले होते आरोप

राक्षसभुवन वाळूघाटावरुन झालेले उत्खनन हे तहसीलदारांनीच सिंडीकेटच्या माध्यमातून केल्याचा आरोप आ.विजयसिंह पंडित यांनी केला होता. तहसीलदारांच्या आशिर्वादाशिवाय हे वाळू उत्खनन व एव्हढा मोठा गैरप्रकार होऊच शकत नाही. पाच हजार ब्रास ऑन रेकॉर्ड वाळू उपसा असतांना प्रत्यक्षात पंचवीस हजार ब्रासहून अधिकचा वाळू उपसा करण्यात आल्याचे देखील समोर आले होते. या सर्व प्रकरणात तहसीलदारांवर देखील कारवाई होईल अशी अपेक्षा होती, परंतु दाखल झालेल्या गुन्ह्यात तहसीलदारांचे नाव नाही, तसेच अद्याप प्रशासनाकडून या प्रकरणात त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT