केज: तालुक्यातील तांबवा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. केज येथील विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा गोविंद चाटे (वय १४ वर्ष) ही रविवारी (दि. २८ डिसेंबर) घरीच होती. दुपारी तिने आपल्या दोन मजली घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यानंतर खोलीतील सीलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपवले.
पोलिसांची कार्यवाही
घटनेची माहिती मिळताच रविवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, उमेश निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
जीवन का संपवले...कारण अस्पष्ट
तनुजा ही अवघ्या १४ वर्षांची होती आणि नुकतीच नववीत शिकत होती. इतक्या लहान वयात तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे तांबवा परिसरात शोककळा पसरली आहे.