गौतम बचुटे
केज : माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या तरुणाच्या २० वर्षीय पत्नीचा, ती एकटी असल्याची संधी साधून विनयभंग करण्यात आला. विशेष म्हणजे, पीडित महिलेच्या कडेवर तिचे ५ महिन्यांचे लहान बाळ असताना आरोपीने हे संतापजनक कृत्य केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एक तरुण आपल्या २० वर्षीय पत्नी आणि ५ महिन्यांच्या बाळासह केज तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून कामाला आहे. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पती शेतात कामाला गेला होता. यावेळी पीडित महिला आपल्या बाळासह घरी एकटीच होती. त्याचवेळी गावातील ऋषिकेश चौरे हा तरुण दुचाकीवरून तिथे आला. 'तुझ्या नवऱ्याकडे नाही, तर माझे तुझ्याकडे काम आहे' असे म्हणून त्याने पीडितेचा हात धरला. "तू मला आवडतेस, इंस्टाग्रामवर मेसेज करूनही तू उत्तर का दिले नाहीस?" असे म्हणत त्याने तिचा विनयभंग केला.
पीडित महिलेने या प्रकाराचा प्रतिकार केला आणि पतीला सांगण्याची तंबी दिली. यावर आरोपीने तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि "तुम्हाला जिवंत ठेवणार नाही" अशी धमकी देऊन आरोपींनी तिथून पळ काढला.
या गंभीर प्रकारानंतर पीडितेने २१ जानेवारी रोजी केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी ऋषिकेश चौरे याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कलम: ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू)(आय) आणि भारतीय न्याय संहिता (BNS): ७४, ७५, ३५१(२), ३५२ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके या स्वतः करीत आहेत.