महिला वकिलाला सरपंचाकडून काठ्या-पाईपने वळ उठेपर्यंत मारहाण File Photo
बीड

Beed Crime | खरचं बीडचा बिहार होतोय का ...?

वकील महिलेला सरपंचासह दहा जणांनी केली अमानुष मारहाण : गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा
गौतम बचुटे

केज :- खरंच बीड जिल्ह्याचा बिहार होतोय असे म्हटल्याने जिल्ह्याची बदनामी होते असा काहींनी सूर आळवला होता आणि त्यावरून राजकारण सुद्धा झाले. मात्र अंबाजोगाई तालुक्यातील एका वकिली करीत असलेल्या महिलेला तिने गावातील भोंग्या संदर्भात निवेदन दिले म्हणून चक्क सरपंच आणि त्याच्या गावगुंडांनी बेदम आणि अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी आरोपी मात्र फरार असून त्यांना कोण राजकीय बळ देतेय याची चर्चा सुरू आहे. संबधित सरपंच आणि त्याच्या बगलबच्चे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाही करण्याची मागणी पीडित वकील महिलेने केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान ही युवती अंबाजोगाई येथे वकिली करीत आहे. दरम्यान ॲड. ज्ञानेश्वरी अंजाज हिने गावातील मंदिरावरील भोंगे आणि गिरण्याचा आवाज बंद करावा कारण तिला मायग्रेनचा त्रास असल्याचे तिने निवेदन दिले होते. त्‍याचबरोबर तिच्या आईच्या तक्रारीवरून एका विरुद्धची तक्रार मागे का घेत नाहीस म्हणून त्या रागातून दि. १४ एप्रिल रोजी अमानुष मारहाण करण्यात आली. सरपंच अनंत अंजान आणि त्याचे साथीदार सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्यूंजय पांडूरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे आणि नवनाथ दगडू मोरे या सर्वांनी तिला शेतात रिंगण करून काठ्या आणि रबर पाईपने जबर मारहाण केली. यामुळे ती युवती बेशुद्ध पडली.

या प्रकरणी पीडित युवतीच्या उपचारा दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या जवाबा वरून संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे स्वतः तपास करीत आहेत.

सोशल मीडियावर मारहाणीचे फोटो व्हायरल

ॲड. ज्ञानेश्वरी अंजान हिला केलेल्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिची पाठ पूर्णतः काळी निळी झालेली आहे. एवढी अमानुष मारहाण तिला करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वरी अंजान हिला मारहाण करणारा सरपंच अनंत अंजान हा तिचा नात्याने चुलत भाऊ असून सुद्धा एवढी अमानुष मारहाण करताना त्याचे मन द्रवले नाही. बहिणीला जर एवढी अमानुष मारहाण तो करत असेल तर मग त्याची गावात किती दहशत असेल ?

आरोपी फरार

मारहाणीच्या घटनेला पाच दिवस उलटून गेले असले तरी यातील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांना जे कोणी राजकीय बळ देत असतील त्यांचाही समावेश गुन्हेगारांच्या यादीत करण्याची मागणी होत आहे. दरम्‍यान प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना पीडित ज्ञानेश्वरी अंजान हिने तिला पोलिसांनी मदत केली असून त्यांच्यामुळेच मी वाचले असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुंडागर्दी करणाऱ्यांना सोलून काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT