कडा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात बेकायदेशीररीत्या फटाके तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दारू गल्ली परिसरात एका घरात विनापरवाना फटाके बनविण्याचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच उपविभागीय पोलीस पथकाने बुधवारी (दि. ४) दुपारी अचानक छापा टाकला.या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ज्वलनशील पदार्थ आणि साहित्य असा एकूण सुमारे ५८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणातील पती-पत्नी मात्र पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात बेकायदेशीररीत्या फटाके तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दारू गल्ली परिसरात एका घरात विनापरवाना फटाके बनविण्याचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच उपविभागीय पोलीस पथकाने बुधवारी (दि. ४) दुपारी अचानक छापा टाकला. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ज्वलनशील पदार्थ आणि साहित्य असा एकूण सुमारे ५८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणातील पती-पत्नी मात्र पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले.
शहरातील दारू गल्ली भागात एका घरात बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने फटाके तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी घरामध्ये फटाके बनविण्यासाठी लागणारी दारू, गंधक, अल्युमिनियम पावडर, तयार बॉम्ब तसेच अन्य ज्वलनशील साहित्य आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून ३६ हजार रुपये किमतीची 'मैफको' ॲल्युमिनियम पावडर (एकूण ६० किलो), २० हजार रुपये किमतीची फटाके बनविण्याची दारू (२० किलो), ८ हजार ५०० रुपयांची कोळसा पावडर (१५ किलो), पांढऱ्या रंगाचे गंधक, भुईनळ्यांसाठी लागणारे साहित्य, तयार बॉम्ब, कागदी पुड्यांचे बॉम्ब आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात मद्दुसर कासिम सय्यद आणि त्यांची पत्नी (दोघे रा.दारू गल्ली,आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान,फटाके तयार करण्यासाठी वापरले जाणारे ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ घरात साठवून ठेवणे हा अत्यंत धोकादायक प्रकार असून, यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे, रहिवासी वस्तीतच अशा प्रकारे फटाके तयार केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नंदकिशोर तांदळे करीत आहेत.
️रहिवासी वस्तीत स्फोटकांचा साठा!
फटाक्यांची निर्मिती करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.