गेवराई : हॉस्टेलची केवळ एक हजार रुपयांची थकबाकी असल्याच्या कारणावरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेवराई शहरातील आहिल्यानगर परिसरात असलेल्या सूर्योदय निवासी वसतिगृहात घडली. ही घटना १२ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी हॉस्टेल चालक सुरेश बाबुराव राठोड यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर बाळू तारू जाधव यांचा मुलगा प्रविण जाधव हा गेवराई येथील सुरेश बाबुराव राठोड यांच्या सूर्योदय निवासी वसतिगृहात राहून नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्याची वार्षिक सुमारे ४० हजार रुपये फीस भरली जात आहे. यावर्षीही ३९ हजार रुपये फीस भरलेली असून केवळ १ हजार रुपये बाकी होते.
ही रक्कम वेळेत का भरली नाही, या कारणावरून हॉस्टेल चालक सुरेश राठोड यांनी विद्यार्थ्याला हाताने व बुक्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पाठीवर व मानेवर गंभीर वळ उठले असून घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलाचे वडील बाळू तारू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात सुरेश बाबुराव राठोड (वय ४०, रा. जांभळी तांडा ता. गेवराई) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५१(२), ३५१(३) तसेच जुवेनाईल जस्टिस अॅक्ट कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डोळस हे करीत आहेत.