केज : शासनाने कितीही कठोर कायदा केला तरी अनेक ठिकाणी बालविवाह होऊन कोवळ्या वयात अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादले जाते, आणि अशा अल्पवयीन मुलींचे बालपण हिरावून घेतले जाते. असाच केज तालुक्यात सुमारे अडीच वर्षापूर्वी बालविवाह लावण्यात आला परंतू त्यावेळी सर्व यंत्रणांना गुंगारा देण्यात आला होता. मात्र त्या नंतर त्या अल्पवयीन मातेची प्रसूती झाल्या नंतर बालविवाह आणि बालालैंगिक अत्याचारप्रकरणी केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील अशोक बारीकराव यादव याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील अल्पवयीन पीडित मुलीचा बालविवाह हा तिचे आई, वडील व नातेवाईकांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये अशोक बारीकराव यादव रा. कोरडेवाडी याचे सोबत लावून दिला होता. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर रविवारी दि.१८ मे तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे सासरच्या मंडळींनी तीला नेकनूर येथील शासकीय महिला रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान महिलेची रुग्णालयात प्रसूती झाली व तीला मुलगा झाला.
दरम्यान उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. मसुरे यांनी महिलेच्या नातेवाईकांकडे आधार कार्डची मागणी केल्यानंतर या पीडितेचा बालविवाह झाल्याचे डॉक्टरच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती नेकनूर पोलिसांना कळविली. अडीच वर्षांपूर्वी हा बालविवाह केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे झाल्यामुळे ही माहिती केज पोलिसांना देण्यात आली.
त्या नुसार केज पोलिसात अशोक बारीकराव यादव रा. कोरडेवाडी ता. केज याचे विरुद्ध बालविवाह आणि बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत. पीडित अल्पवयीन महिला व बाळ हे नेकनूर येथील रुग्णालयात सुखरूप असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मसुरे यांनी दिली आहे.