Beed Accident BJP Corporator's Son in Fatal Crash: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार चालवताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
माजलगाव शहरातील गढी रोडवर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी हा अपघात झाला. प्रल्हाद गायकवाड आणि सुनीता गायकवाड हे दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही हवेत उंच उडून रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.
या अपघातात प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सुनीता गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे या अपघातात संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील भाजप नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके हा कार चालवत होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी काही तरुणांमध्ये गाड्यांची शर्यत सुरू होती. याच शर्यतीदरम्यान हा अपघात झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारची धडक बसल्यानंतर दुचाकीवरील दाम्पत्याला सुमारे 100 ते 150 फूट फरफटत नेण्यात आले. मात्र, गाड्यांची शर्यत सुरू होती का आणि अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यामध्ये भरधाव कार दुचाकीला जोरदार धडक देताना दिसत आहे. धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही हवेत उडून रस्त्यावर पडल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या दृश्यांमुळे अपघाताची भीषणता समोर आली आहे.
या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मित्रांमध्ये सुरू असलेल्या कारच्या शर्यतीमुळे हा अपघात घडल्याची चर्चा आहे. पोलीस या दिशेने तपास करत असून, अपघाताची नेमकी कारणे आणि संबंधितांची जबाबदारी तपासानंतर स्पष्ट होणार आहे.