बीड : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे आरोप असलेल्या कृष्णा शिवाजी गायकवाड (रा. दादेगाव, ता. आष्टी) याच्याविरुद्ध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. बीड,अहिल्यानगर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांतून त्याला तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, पाटोदा यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, अंभोरा पोलिसांच्या प्रस्तावानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
️मारामारीपासून धमकावण्यापर्यंत गुन्हे दाखल..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा गायकवाड याच्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात मारामारी,धमकावणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि दहशत पसरविण्यासारख्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कथित कृत्यांमुळे अंभोरा परिसरासह आष्टी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्यामुळे केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव
नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अंभोरा पोलिसांनी पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम प्राधिकाऱ्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. प्रस्तावाची कायदेशीर चौकशी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, पाटोदा यांनी दोन वर्षांच्या हद्दपारीचे आदेश जारी केले.
️गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्याचा प्रयत्न..
तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाईल,असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी सहन केली जाणार नसून, दहशत निर्माण करणाऱ्या आणि कायदा- सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.