बीड

Beed Crime : आई-वडिलांचा राग मनाला लागला; आष्टीतील २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

पुढारी वृत्तसेवा

कडा : आई-वडील रागावल्याचा मनावर खोल परिणाम झाल्याने एका २१ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सांगवी (पाटण) येथे घडली. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विराज हा घरच्या कामात मदत करत नसल्यामुळे त्याचे आई-वडील त्याला समज देत होते आणि त्यावरून ते त्याला थोडे रागावले होते. मात्र, आई-वडिलांचा हा राग विराजच्या मनाला लागला. याच रागाच्या भरात त्याने मंगळवारी (दि. १०) सकाळी गावाजवळील 'काळशेत' शिवारातील आपल्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेतला.

बहिणीने पाहिला तो थरार

काही वेळाने विराजची बहीण शेतात गेली असता, तिला विराज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला खाली उतरवून उपचारासाठी कडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला 'मृत' घोषित केले.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

विराजच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT