Majalgaon Speeding Car Hits Bike
माजलगाव : भररस्त्यात वाहनांची शर्यत (रेस) लावण्याचा जीवघेणा थरार एका निष्पाप शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर बेतल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि. २०) माजलगाव शहराजवळ घडली. शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या डक पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात कारने पतीला तब्बल ४०० मीटर फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी पत्नीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून दोन चारचाकी वाहनांची भररस्त्यात रेस लागली होती. ही दोन्ही वाहने अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने धावत होती. दरम्यान, मंगरूळ नं. ३ येथील प्रल्हाद श्रीमंत गायकवाड (वय ५०) आणि त्यांची पत्नी सुनिता प्रल्हाद गायकवाड (वय ४५) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 20 ZP 6085) केसापुरी वसाहतीच्या पुढे असलेल्या डक पेट्रोल पंपासमोरून माजलगाव शहराकडे येत होते. त्याच वेळी समोरून वाऱ्याच्या वेगाने आलेल्या कारने (क्रमांक MH 44 AD 5141) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
कारचा वेग इतका प्रचंड होता की, धडकेनंतर कारने प्रल्हाद गायकवाड यांना तब्बल ४०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या सुनिता गायकवाड यांना तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र जबर मार लागल्याने सायंकाळी ६ वाजता उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता; परंतु जोरदार धडकेमुळे गाडीच्या एअरबॅग (Airbags) उघडल्याने गाडी जागेवरच थांबली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हे वाहन एका नगरसेवकाचा मुलगा चालवत होता आणि त्याच्या बाजूच्या सीटवर त्याचा रेणापूर येथील मित्र बसलेला होता, अशी जोरदार चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला.