वडवणी : तुमचा मुलगा माझ्या मुलीच्या मागे का फिरतो, असे म्हणतं एका व्यक्तीने वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांवर धारदार शस्राने जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना वडवणी शहरातील पांढरेवस्ती येथे बुधवारी (दि. ३०) रात्री दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात धर्मराज गुरसाळी यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली असून, त्यांची पत्नी शोभा गुरसाळी (वय ७५) यांच्याही हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी विठ्ठल वरवडे (रा. राम मंदिर चौक, वडवणी) याच्याविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा धर्मराज गुरसाळी या पांढरेवस्ती येथे पती धर्मराज यांच्यासोबत राहतात. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी विठ्ठल वरवडे हा त्यांच्या घरी आला. त्याने घरातून आतून कडी लावली. यावेळी त्याने, "तुझ्या मुलाला माझ्या मुलीच्या नादी लागू नको, असे सांगितले होते. तरीही तो तिच्या मागेच आहे. तुम्हाला समजावून सांगितले होते. 'मला माझी मुलगी तुम्हाला द्यायची नाही," असे म्हणत दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने हातातील धारदार शस्राने धर्मराज गुरसाळी यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी पुन्हा वार करण्याच्या तयारीत असताना पत्नी शोभा गुरसाळी यांनी आरोपीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही धारदार हत्याराने वार केला. मात्र, शोभा यांनी आरोपीला ढकलल्याने हा वार त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला लागला आणि त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर शोभा गुरसाळी यांनी गुरुवारी (दि.१) दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल वरवडे याच्यावर वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड करत आहेत. आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.