धारूर : धारूर-माजलगाव मार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या धारूर घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. सरकी घेऊन माजलगावच्या दिशेने जाणारा एक ट्रक घाटातील धोकादायक वळणावर अचानक पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघाताच्या तीव्रतेमुळे ट्रकच्या काचा फुटून चालक थेट ३० फूट खोल दरीत फेकला गेला. या घटनेत चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी मुका मार लागला आहे. ही घटना गुरूवारी (दि.२७) सायंकाळी साडेसाठ वाजता घडली.
घाटातील धोकादायक वळणे, रस्त्याची दुरवस्था आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. विशेषतः अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक आणि घाटातील अरुंद व धोकादायक रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, धारूर घाटात वारंवार अपघात होत असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिक व वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.
घाटतील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, त्याआधी तात्पुरती उपाययोजना म्हणून आपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, संरक्षक कठडे, योग्य दिशादर्शक फलक तसेच रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
धारूर घाट हा धारूर-माजलगाव मार्गावरील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी व मालवाहतूक करणारी वाहने या मार्गावरून ये-जा करतात. मात्र, घाटातील परिस्थितीमुळे वाहनचालकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित यंत्रणांकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने वाहनचालक आणि प्रवासी हतबल झाले आहेत. घाटातील अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.