FIR against Balraje Aware Patil
माजलगाव : पोलिसांविरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘१०१ शिवस्मारक यात्रा’च्या समारोप कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात आवारे पाटील यांनी, “यापूर्वी पोलिसांना सहकार्य केले; मात्र गेल्या दीड वर्षांत पोलिसांकडून त्रास सहन करावा लागला. तो वर्दीचा मान राखून सहन केला. पण यापुढे जो कोणी शिवछत्रपतींच्या स्मारकाला विरोध करेल, त्याच्या वर्दीला बाजूला करून त्याला फटके दिले जातील,” असे वक्तव्य केले. या वक्तव्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री माजलगाव शहरातील मोंढा मैदान येथे यात्रेचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी आयोजकांना नियोजित वेळेत सभा व मिरवणूक पार पाडावी तसेच भाषणांमध्ये आक्षेपार्ह विधान करू नयेत, अशी लेखी नोटीस देण्यात आली होती.
तथापि, कार्यक्रमाने वेळेची मर्यादा ओलांडली. सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आवारे पाटील यांनी पोलिसांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरून दुखापत करण्याचा इशारा दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वर्दी बाजूला सारून मारहाण करण्याची भाषा केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अंगद घोडके यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे बाळराजे आवारे पाटील यांच्यासह आयोजक हनुमान कालिदास फपाळ (रा. आलापूर), नामदेव माणिक सोजे (माजलगाव) आणि श्रीरंग हरिभाऊ पालकर (मालीपारगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.