बीड : बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी खंडाळा येथे शेतकऱ्याच्या शेतात उतरून चक्क केली सोयाबीनची पेरणी.या परिसरात सध्या शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असून, त्यांच्या या मेहनतीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतमळ्यात उतरून सोयाबीनच्या बियाण्याची मुठ धरून पेरणी केली.
यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळण्यापेक्षा आपल्या अडीअडचणी ह्या प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोलून व्यक्त करा, जिल्हा प्रशासन हे आपल्यासाठीच आहे ही भावना त्यांच्यात रुजावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेती संदर्भात अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन कृषी विभागाच्या वतीने योग्य बियाणे, खतांचा पुरवठा व सल्ला वेळेत मिळावा, यासाठीही सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.