बीड : बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरती झाल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात विविध ठिकाणी तक्रारी आणि माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल करणाऱ्या वैभव छगन चव्हाण (वय २६, रा. नवगण राजुरी, ता. बीड) या तरुणाने जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कुराश संघटनेतील प्रतिनिधी व इतर लोकांसह नागनाथ साबळे याच्याविरुद्ध जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव चव्हाण हा धाराशिव येथील पोलीस भरती प्रक्रियेत क्रीडा कोट्यातून प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, क्रीडा कोट्यातून शेवटच्या क्रमांकावर भरती झालेल्या नागनाथ साबळे याच्याकडे बनावट क्रीडा प्रमाणपत्र असल्याची माहिती वैभवला मिळाली होती. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर नागनाथ साबळे याने कुराश संघटनेच्या माध्यमातून संबंधित प्रमाणपत्र मिळवून भरती झाल्याचा आरोप वैभवने केला होता.
या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी वैभवने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्त कार्यालयासह विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. तसेच माहिती अधिकारांतर्गतही अर्ज दाखल केले होते. या तक्रारींमुळे संबंधित लोक वैभववर पाळत ठेवत असल्याचा आणि त्यामुळे तो सतत मानसिक तणावाखाली राहत असल्याचा आरोप त्याच्या भावाने फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, ५ नोव्हेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात ज्योतिबा मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला वैभवने गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी वैभवचा भाऊ गणेश छगन चव्हाण (वय ३४) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि.६) रात्री १० वाजून ४७ मिनिटांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुराश संघटनेतील प्रतिनिधी व इतर संबंधित व्यक्ती तसेच नागनाथ साबळे यांच्या संगनमतामुळे वैभवला जीवन संपविण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप गणेश चव्हाण याने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.