Crime  Pudhari
बीड

Beed Crime : ५०० रुपयांच्या बाँडची तब्बल ३,५०० रुपयांना विक्री; ७० वर्षीय विक्रेत्यावर गुन्हा

बीड लाचलुचपत विभागाच्या धडक कारवाईने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : मुद्रांक बाँडच्या (स्टम्प पेपर) छापील किमतीपेक्षा अवाजवी आणि अधिक रक्कम आकारून विक्री होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेवराईत धडक कारवाई केली. मागील तारखेचा अवघा ५०० रुपयांचा बाँड तब्बल ३ हजार ५०० रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी ७० वर्षीय बाँड विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश सखाराम पाचपुते (वय ७०, रा. बेदरे गल्ली, गेवराई) असे कारवाई करण्यात आलेल्या बाँड विक्रेत्याचे नाव आहे. शनिवारी (दि. १७) गेवराई तहसील कार्यालयाच्या आवारातच एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. यामुळे बेकायदेशीर बाँड विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

शासकीय व कायदेशीर कामांसाठी नागरिकांना ५०० रुपयांच्या बाँडची गरज भासते. याचा गैरफायदा घेत तक्रारदाराकडे मागील तारखेचा बाँड देण्यासाठी ३,५०० रुपयांची अवाजवी मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत तातडीने बीड एसीबीकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने खात्री करून कारवाई केली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुद्रांक बाँडची छुप्या पद्धतीने आणि छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत होती. एसीबीच्या या कारवाईमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणत्याही नागरिकाकडून अशा प्रकारे अवाजवी रक्कम मागितल्यास त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मच्छिंद्र बिडकर, अमोल खरसाडे आणि चालक अंबादास पुरी यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT