केज : केजमध्ये दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी (दि.३१) रात्री १०.४५ च्या सुमारास केज तालुक्यातील चंदनसावरगावजवळ घडली. अपघातातील मृतांची व जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सुचनेनुसार बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले.