Beed bus station has become a hub for illegal activities
बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड बसस्थानकाची नूतन इमारत सुंदर आणि आकर्षक बांधण्यात आली असली तरी त्या परिसरात गेल्या काही दिवसांत अत्यंत किळसवाणे प्रकार सुरू आहेत. सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षा मात्र यामुळे धोक्यात आली असून एसटीचे अधिकारी, कंत्राटी सुरक्षा कर्मचारी आणि या ठिकाणी नियुक्त पोलिस कर्मचारी सर्वजण एकमेकांवर खापर फोडण्यात धन्यता मानत आहेत.
यावर ठोस उपाययोजना आणि त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच करण्याची मागणी जोर धरत आहे. रविवारी रात्री या ठिकाणी दोन तृतीयपंथीयांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. सोलापूर-धुळे महामार्गावर बीडचे बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी आहे, यामुळे या ठिकाणी दररोज शेकडो बस आणि हजारो प्रवासी ये-जा करत असतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वीच सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आलेली आहे.
इमारत उभारल्यानंतर या ठिकाणी प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि मिळेल असे अपेक्षित होते. परंतु या ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना आता प्रवाशांच्या सुरक्षेचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. बीड बसस्थानकात रात्री उशिरापर्यंत बसेस येत असतात, त्यामुळे प्रवाशांची चढ-उतार सुरू असते. परंतु रात्री दहा वाजेनंतर या ठिकाणी मद्यपान करून आलेले लोक धिंगाणा घालतात, याबरोबरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिलांचाही वावर या ठिकाणी असल्याचे समोर आले आहे.
याबरोबरच तृतीयपंथीयदेखील या ठिकाणी थांबलेले असतात. अनेकदा या लोकांमध्ये बाद होतात, मारामारी होते, यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक एकाच विकाणी बसून आपले 'कर्तव्य' बजावत असतात. बसस्थानक परिसरात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी आपली नाही, असाच त्यांचा आविर्भाव असतो. याबरोबरच ज्या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाच्या बसेस उभा असतात, त्या ठिकाणीही पुरेशी सुरक्षा नसते, यामुळे या बसेसमध्येही अनेक गैरप्रकार सुरू असतात.
विभागीय नियंत्रकांचे नियंत्रण नाही?
बीड बसस्थानकात गत काही काळापासून गैरप्रकार सुरु आहेत. बसस्थानकाच्या बाजुलाच विभागीय नियंत्रकांचे कार्यालय आहे, परंतु त्यांचे मात्र या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष आहे. सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत नाहीत, बसस्थानकाच्या परिसरात सीसीटीव्ही कार्यरत नाहीत या बाबीवर संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना करणे, केलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसेल तर कारवाई करणे अपेक्षित आहे, परंतु बीडच्या विभागीय नियंत्रकांचे या सर्व प्रकारावर नियंत्रण नाही का? असा प्रश्न वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उपस्थित होत आहे.
बसस्थानकात बारा सुरक्षा रक्षक नेमके काय करतात?
बीड बसस्थानकाच्या सुरक्षेकरिता दररोज बारा सुरक्षा रक्षक खासगी एजन्सीमार्फत कार्यरत असतात, परंतु ते नेमके कोणाच्या सुरक्षेचे काम करतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एजन्सीच्या मालकाचा थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क असल्याने हे गार्ड बसस्थानकातील अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याची देखील चर्चा आहे.
गस्त वाढवण्याची मागणी
बीडचे बसस्थानक शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. या ठिकाणी दिवसभर दोन कर्मचारी नियुक्त असतात असे कागदोपत्री दिसते. परंतु प्रत्यक्षात हे कर्मचारी नेमके काय करतात, हाही संशोधनाचा विषय आहे. अनेकदा चोऱ्या, मारामाऱ्या झाल्यानंतर त्यांना फोन करून बोलवावे लागते. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्त केली जात असल्याचेही सांगितले जाते, परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, अवैध धंदे करणारे लोक या गस्त करणाऱ्या पोलिसांच्या नजरेत येत नसावेत असा देखील अंदाज आहे. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांनीच एखादे विशेष पथक नेमावे लागते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकाच्या पाठीमागील रस्ता धोकादायक!
बीड बसस्थानकाच्या पाठीमागील रस्ता अवैध धंद्यांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी रात्री सात वाजल्यापासूनच गैरप्रकार सुरू असतात. रस्त्यावर अंधार असल्याचा गैरफायदा काही मंडळी घेतात, यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न कायम असून शिवाजीनगर पोलिस देखील बाबाबत उदासीन आहेत.