प्रातिनिधक छायाचित्र pudhari file photo
बीड

Beed News | भर पावसाळ्यातही आष्टी शहरात पाणीटंचाई तीव्र; नगरपंचायतीकडून १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

जुलै संपला तरी दमदार पाऊस नाही; मेहेकरी जलयोजनेवर शहराची भिस्त, टँकरची संख्या वाढविण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : भर पावसाळ्याचा हंगाम सुरू असतानाही आष्टी शहरासह परिसरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी आष्टी नगरपंचायतीला शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी तब्बल १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

सामान्यतः पावसाळ्यात जलस्रोत भरून निघतात आणि टँकरची गरज भासत नाही. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने आष्टीकरांना उन्हाळ्याप्रमाणेच पाण्यासाठी झगडावे लागत आहे. केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर अनिश्चिततेचे सावट असून नागरिकांनाही पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

आष्टी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाळदंत मोरे यांनी सांगितले की, प्रत्येकी २० हजार लिटर क्षमतेच्या १५ टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा सुरू आहे. आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या मेहेकरी पाणीपुरवठा प्रकल्पातून पाणी आणून नागरिकांना वितरित केले जात आहे. पुढील काही दिवसांतही समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शहराची गरज लक्षात घेऊन टँकरची संख्या वाढवावी लागू शकते.

शहरातील अनेक भागांमध्ये नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा टँकरवरच मोठ्या प्रमाणात आधार आहे. वाढती लोकसंख्या, प्रत्येक घरातील वाढलेला पाण्याचा वापर आणि अपुरा साठा यामुळे अनेक कुटुंबांना खासगी टँकर किंवा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणीही वाढत आहेत.

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून दीर्घकालीन जलनियोजनाची मागणी जोर धरू लागली आहे. केवळ टँकरपुरवठ्यावर अवलंबून न राहता जलसंधारणाची कामे, पावसाचे पाणी साठवण, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा आष्टीकरांना अजूनही लागून असून, पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर शहरासह परिसरातील पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT