Illegal sand mining pudhari photo
बीड

Beed Crime | टाकळी अमिया येथे दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा; तलाठ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे माफियांचे फावले

नदीपात्रात चार ते पाच जेसीबी आणि सुमारे वीस ट्रॅक्टरच्या सहाय्याने खुलेआम वाळू उपसा सुरू

पुढारी वृत्तसेवा

Ashti Illegal Sand Mining

बीड : आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया परिसरात मागील काही दिवसांपासून नदीपात्रातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांचे मनोबल वाढले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात चार ते पाच जेसीबी आणि सुमारे वीस ट्रॅक्टरच्या सहाय्याने खुलेआम वाळू उपसा सुरू असतानाही संबंधित तलाठी भाऊसाहेब यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

टाकळी अमिया येथील नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन केले जात असून, हा प्रकार दिवसा सुरू असतानाही महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही तलाठी स्तरावरून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, नदीपात्राची नासधूस तसेच भविष्यात पाणीटंचाईचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.

“सर्व काही उघडपणे सुरू असताना तलाठी भाऊसाहेब कारवाई का करत नाहीत?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, या अवैध वाळू उपशामागे कुणाचे आशीर्वाद आहेत का, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात तहसीलदार व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असताना महसूल यंत्रणा नेमकी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? तलाठ्यांना वाळू माफियांची भीती आहे की भागीदारी? असे थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पोलीस प्रशासन अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त करते व चालकांवर कारवाई करते; मात्र महसूल विभागातील तलाठी भाऊसाहेब नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. वाळू उपसा रोखणे, पंचनामा करणे आणि शासनाचा महसूल वाचवणे ही जबाबदारी असतानाही संबंधित अधिकारी मौन बाळगून बसल्याचे चित्र दिसत आहे. सर्व माहिती असूनही कारवाई होत नसेल, तर हे अक्षम्य दुर्लक्ष आहे की वाळू माफियांना दिलेली मूकसंमती? असा थेट सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT