Ashti Water Supply Department Pudahri
बीड

Beed MNS Sting Operation| आष्टी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कारभार चव्हाट्यावर; मनसेचे स्टिंग ऑपरेशन

कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गैरहजर असल्याचा दावा; चौकशी करून कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Ashti Water Supply Department

कडा : आष्टी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी थेट कार्यालयात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. या पाहणीदरम्यान काही अधिकारी-कर्मचारी आपल्या आसनावर उपस्थित नसल्याचे आढळून आल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अचानक भेट

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरी, नळ योजना, दुरुस्तीची कामे आणि विविध प्रशासकीय प्रश्नांसाठी नागरिकांची विभागीय कार्यालयात नेहमी वर्दळ असते. मात्र, अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी दरेकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी दरेकर यांनी कार्यकर्त्यांसह कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणीचे चित्रीकरणही करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘दौऱ्यावर’ असल्याचे कारण?

अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसताना नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित अधिकारी प्रत्यक्ष शासकीय कामासाठी दौऱ्यावर होते की अन्य कारणामुळे कार्यालयाबाहेर होते, याची स्पष्टता प्रशासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यालयीन उपस्थिती आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांची नोंद तपासल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असे दरेकर यांनी म्हटले.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्न गंभीर असताना संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसतील तर नागरिकांच्या अडचणी सोडविणार कोण, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

“शासकीय वेळेत अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे? दौऱ्याच्या नावाखाली जनतेची दिशाभूल होत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा कैलास दरेकर यांनी दिला. स्टिंग ऑपरेशनचे चित्रीकरण व इतर पुरावे वरिष्ठ प्रशासनाकडे सादर करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

‘बस फेल झाली म्हणून उशीर झाला; जाऊ द्या सर, कशाला बातमी देता!’

पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत गोरे यांच्या फोनवरून औटी यांच्याशी संपर्क साधला असता, “बस फेल झाल्यामुळे उशीर झाला,” असे कारण सांगण्यात आल्याचा दावा आहे. त्यानंतर “जाऊ द्या सर, कशाला बातमी देता?” असा सल्ला देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या वक्तव्यामुळे विभागाच्या कारभाराबाबत आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT